रामवरदायिनी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले, एअरबॅगमुळे वाचले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार येथील श्री रामवरदायिनी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पनवेल येथील भाविकांच्या वाहनाला पार गावाजवळ अपघात झाला. गंगूच्या वहाळ येथे झालेल्या अपघातातून सुदैवाने पनवेल येथील भाविकांचे प्राण वाचले.

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जात आहे. किल्ले प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात व पार येथील श्री रामवरदायिनी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर भाविक येत आहेत. पनवेल येथील भाविक शनिवारी पार येथील श्री रामवरदायिनी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. गंगूच्या वहाळ येथे मागील वर्षी रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर दरड कोसळली होती. त्यामुळे तेथे बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता मातीचा असून, पावसामुळे पूर्ण उखडला आहे. शिवाय या ठिकाणी तीव्र उतार आहे. अनेकवेळा वाहने येथे फसतात. पनवेल येथील भाविकांच्या कारचालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची कार वळणावर उलटली. मात्र, कार उलटताच एअरबॅग्ज उघडल्याने कार मधील भाविकांचे प्राण वाचले आहेत.

अपघाताची खबर पार व कुंभारोशी येथील ग्रामस्थांना समजताच गावातील लोक अपघातस्थळी जमा झाले. त्यांनी पनवेल येथील भाविकांची कार सरळ केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी कुंभारोशी व पार येथील ग्रामस्थांनी केली आहे.