बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) वयाच्या 47व्या वर्षी लग्नबंधनात अडकला आहे. रणदीपने 10 वर्षांहून लहान प्रेयसी लिन लैशरामसोबत (Lin Laishram) सप्तपदी घेतली. रणदीप आणि लिनने मणिपुरी रीतिरिवाजानुसार लग्न केले आहे. लग्नाचे फोटो रणदीपने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
रणदीप हुड्डा प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत रणदीपने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. तसेच लग्नाची तारीखही त्याने सांगितली होती. त्यानुसार मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये रणदीप आणि लिनचा शाही विवाहसोहळा पार पडला. याचे फोटो त्याने लग्नानंतर काही तासात इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम या जोडप्याने मणिपुरी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. दोघांनीही लग्नात पारंपरिक कपडे आणि दागिने घातले होते. रणदीपने पांढऱ्या रंगाचे मणिपुरी कपडे घातले आणि डोक्यावर पगडी बांधली होती. तर लिन लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसली. तिने पोलोई हा बांबू आणि जाड कापडापासून तयार केलेला दंडगोलाकार स्कर्ट परिधान केला होता.
View this post on Instagram
दरम्यान, लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून नवविवाहित दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनीही वधूवराला शुभेच्छा दिल्या आहेत.