
एकमेकांवर रंगाची उधळण करत रत्नागिरीत रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपंचमीमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. वर्षभरातील रूसवे-फुगवे बाजूला ठेवून सर्वजण रंगात न्हावून निघाले होते.
रत्नागिरीत रंगपंचमीला रंगाची उधळण करत होळी उत्सवाची सांगता केली जाते. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीबुवाची पालखी दुपारी सहाणेवरून उठल्यानंतर रंगाची उधळण केली जाते.गुलालात सर्वजण न्हावून निघतात. त्यानंतर घरोघरी रंगपंचमी साजरी केली जाते. लहान मुले आणि तरूणवर्ग सकाळपासून रंगपंचमीची तयारी करतात. बादल्यांमध्ये विविध रंग तयार केले जातात. रंगाच्या पाण्याने फुगेही भरून ठेवले जातात. ही सर्व तयारी झाली की दुपारनंतर रंगपंचमी खेळायला सुरूवात होते. पिचकारीने एकमेकांच्या अंगावर रंग उधळतो तर कुणी हाताने एकमेकांना रंग लावतात. रंगाने भरलेले फुगे मारूनही रंगपंचमी साजरी केली जाते. राग द्वेष बाजूला ठेवून सर्वजण रंगात एकरूप होतात.ही रंगपंचमी सायंकाळपर्यंत सुरू होती.रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही रंगवले जात होते. रंगात सर्वजण न्हावून निघाले होते.


























































