वेळ पडली तर दुर्गेचे रूप धारण करा!- राणी मुखर्जीचा महिलांना सल्ला

966

कुठल्याही कठीण प्रसंगातून जाताना आपली शक्ती ओळखून प्रत्येक महिला दुर्गा होऊ शकते. महिलांनी सतर्क राहावे, आपल्यासोबतच देशालाही सक्षम करावे. चुकीचे वागणाऱयांना धडा शिकवावा, असे मत अभिनेत्री राणी मुखर्जी हिने सोमवारी नाशिक पोलीस दलातर्फे आयोजित परिसंवादात मांडले. विचारांचा व्यभिचार होण्याआधीच संबंधित प्रवृत्तीला रोखण्यासाठी समाजाने कृती करावी, असे आवाहन अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी केले. सक्षम व्हा, स्वसंरक्षणाला प्राधान्य द्या, असा सूरही या परिसंवादात उमटला.

मुलींना धाडसी, मुलांना समजूतदार बनवा 

मुलगा समजूतदार असला तर तो कुठल्याही मुलीवर अत्याचार करणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांना समजूतदार आणि मुलींना धाडसी बनवा, तरच समाज सुरक्षित होईल, असा संदेश व्हिडीओद्वारे पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी दिला. घरी उशिरा येणाऱया, व्यसनी मुलांना आई-वडिलांनी जाब विचारला पाहिजे. मुलांनाही शिस्त लावावी, असे त्या म्हणाल्या. नाशिक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबवलेल्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.

‘नाशिक शहर पोलीस’ आणि ‘द रिअल टॉक’ यांच्यातर्फे ‘महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी राणी म्हणाली, ‘निर्भया’ केसनंतर मनात प्रचंड राग होता, अजूनही अशा घटना घडतच आहेत. हे बघता प्रत्येक मुलीने आपण दुर्गा आहोत ही ताकद ओळखावी. हेच मी ‘मर्दानी 2’ च्या शिवानी रॉयच्या भूमिकेतून मांडले. अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, स्त्रीचे रोजचे जगणे सहज होऊ द्या. त्यांना हक्क मिळायला हवेत. भावनेची वासना होण्याआधी, विचारांचा व्यभिचार होण्याआधी त्यावर ठोस कृती व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही मार्गदर्शन केले. या परिसंवादात लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही सहभाग घेतला.

हैदराबाद, उन्नावसारख्या घटना देशात घडत असताना प्रत्येकाच्या मनात संतापाची लाट उसळली, अशावेळी समाज, पोलीस, प्रशासन काय करू शकतात, आपण काय भान ठेवले पाहिजे, काय भूमिका घ्यायला हवी, या उद्देशाने हा परिसंवाद घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील अत्याचारांपैकी 30 टक्के पीडित 12 ते 16 वयोगटातील आहेत. शहरामध्ये मुली, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक, कीऑक्स, सीसीटीव्ही, त्याचबरोबर सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निर्भया मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले.

आपली प्रतिक्रिया द्या