राणीबागेतील शक्ती-करिश्माचे ‘जमले’! पिल्लांसाठी वाघ नर-मादीचा ‘रोमान्स’ वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात गेल्या वर्षी संभाजीनगरमधून आणलेल्या वाघांच्या जोडीची आता चांगलीच जवळीक वाढली आहे. त्यामुळे मादीच्या मासिक ऋतुचक्रादरम्यान शक्ती नर आणि मादी करीश्मा यांना गर्भधारणेच्या दृष्टीने एकत्र आणले जात आहे. त्यामुळे शक्ती आणि करिश्माला एकमेकांबद्दल आकर्षण आणि रोमान्स वाढला आहे. त्यामुळे राणीबागेतील वाघांच्या जोडीकडून लवकरच ‘गोड बातमी’ मिळेल, अशी अपेक्षा संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईकरांना जंगल सफारीचा आनंद देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून राणीबागेत अनेक पशु-पक्षी आणले जात आहेत. यामध्ये केवळ विदेशात आढळणाऱया केंग्विनसह वाघ, बिबटय़ा, अस्वल, अजगर, खुँकार तरस, कोल्हा यांच्यासारख्या जंगली प्राण्यांसह शंभरहून जास्त प्रकारचे देशी-विदेशी पक्षीही आणले गेले आहेत. राणीबागेत सुरू केलेले मुक्त पक्षीविहार हे देशातील सर्वात मोठे पक्षीविहार ठरले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आणलेल्या शक्ती वाघाचे वय साडेतीन वर्षे असून मादीचे वय साडेचार वर्षे आहे. वाघ मादी दोन ते अडीच वर्षांनतर पिल्ले देण्यासाठी तयार होत असल्यामुळे सद्यस्थितीत राणी बागेतील नर आणि मादीही ब्रिडिंगसाठी सक्षम असल्याची माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

तीन ते चार पिल्लांचा अंदाज

वाघ मादी करिश्मामध्ये अजून गर्भधारणा झाली नसली तरी आगामी काळात लवकरच होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. यामध्ये मादी तीन ते चार पिल्लांना जन्म देऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेच्या दृष्टीने सद्यस्थितीत मादीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मासिक ऋतुचक्र आल्यावर मादी काहीशी मवाळ होते. शिवाय नराकडे आकर्षित झाल्याची लक्षणे दाखवते. यावेळी नर-मादीला एकमेकांबद्दल प्रचंड आकर्षण वाढते. त्यामुळे प्रत्येक ऋतुचक्रादरम्यान नर-मादीला एकत्र आणले जात आहे.