
सामना ऑनलाईन नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायमूर्ती रंजन गोगोई हे आता देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. या पदासाठी गोगोई यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केली आहे. येत्या ३ ऑक्टोबरला गोगोई सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांचा कार्यकाळ १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत असेल.
केंद्रीय विधी मंत्रालयाने पत्र लिहून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना सेवाजेष्ठता व अन्य निकषांच्या आधारे नव्या सरन्यायाधीशांचे नाव सुचविण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश मिश्रा यांनी या पदासाठी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केली आहे.
गोगोई यांची कारकीर्द
२८ फेब्रुवारी २००१ मध्ये न्या रंजन गोगोई यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. १२ फेब्रुवारी २०११ ला गोगोई पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती निवडप्रणालीवर सवाल करणाऱ्या न्यायधीशांत गोगोई यांचाही समावेश होता. न्यायपालिकेची स्वतंत्रता कायम राखायलाच हवी असे ठाम प्रतिपादनही गोगोई यांनी केले होते.

























































