
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या लढती या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतात. मात्र, गुरुवारी सूर्यग्रहण असल्याने खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत ज्या ठिकाणी सूर्यग्रहणाचा अधिक प्रभाव आहे अशा ठिकाणी लढती दोन तास उशिरा सुरू करण्याचा निर्णय हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.
गुरुवारी सकाळी हिंदुस्थानातील काही भागात कंकणाकृती, तर बहुतांश भागात खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. सकाळी साडेनऊच्या दरम्यान सूर्यग्रहणाचा बिंदू परमोच्च असल्याने ‘बीसीसीआय’ने ग्रहणाची तीव्रता ज्या भागात अधिक आहे तेथील रणजी लढती साडेनऊऐवजी साडेअकरा वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी असते. मात्र उत्साहाच्या भरात उघडय़ा डोळ्यांनी अथवा असुरक्षित साधनांनी बराच वेळ सूर्यग्रहण बघत राहिल्यास तुमचे डोळे कायमचे अथवा अर्धनिकामी होण्याचा धोका असतो. शिवाय सूर्यग्रहणामुळे डोळय़ाला अंधत्व आल्यास त्यावर शस्त्रक्रियाही करता येत नाही. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षेला महत्त्व देत काही ठिकाणी दोन तास रणजी क्रिकेट लढती उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
– डॉ. राहुल देशपांडे (वैद्यकीय संचालक, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर)
































































