सौराष्ट्र 181 धावांनी पिछाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

जय बिस्ता व कर्णधार सिद्धेश लाडच्या दमदार शतकांच्या जोरावर मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘अ’ गटातील लढतीत पहिल्या डावात 394 धावा तडकावल्या. शेल्डॉन जॅकसनच्या 95 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसअखेरीस 5 बाद 213 धावा तडकावल्या असून आता त्यांचा संघ 181 धावांनी पिछाडीवर आहे.

मुंबईने 5 बाद 334 या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. सिद्धेश लाडने एक षटकार व 16 चौकारांसह 108 धावांची खेळी साकारली. शिवम दुबेने 39 धावांची आणि रॉयस्टन डियासने नाबाद 20 धावांची खेळी केली. मात्र मोठी खेळी कोणालाही करता आली नसल्यामुळे मुंबईला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट याने 71 धावा देत चार फलंदाजांना बाद केले. धमैंद्र जाडेजा व चेतन सकारिया यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

रॉयस्टन डियास व मिनाद मांजरेकर यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे सौराष्ट्रची दुसऱ्या डावात 3 बाद 37 धावा अशी अवस्था झाली. शेल्डॉन जॅकसन याने सौराष्टचा डाव सावरला. त्याने या खेळीत तीन षटकार व आठ चौकारांची बरसात केली. आता प्रेरक मांकड 56 धावांवर खेळत आहे.