
अनुस्तुप मजुमदारने पहिल्या डावात झळकावलेले शतक अन् दुसऱया डावात केलेली महत्त्वपूर्ण खेळी आणि इशान पोरेल, मुकेशकुमार व आकाश दीप यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर बंगाल क्रिकेट संघाने गतविजेत्या कर्नाटकला 174 धावांनी धूळ चारली आणि तब्बल 13 वर्षांनंतर रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अनुस्तुप मजुमदारची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
बंगालकडून कर्नाटकसमोर विजयासाठी 352 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. कर्नाटकने 3 बाद 98 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांचा डाव 55.3 षटकांत 177 धावांमध्येच गडगडला. देवदत्त पड्डीकलने 62 धावांची खेळी साकारली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. इतर फलंदाजांनाही अपयशाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुलला बाद करणाऱया मुकेशकुमारने दुसऱया डावात 61 धावा देत 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दृष्टिक्षेपात
बंगालने आतापर्यंत दोन वेळा रणजी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. 1938/39 सालामध्ये बंगालने दक्षिण पंजाबला हरवून पहिल्यांदाच रणजी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 1989/90 सालात त्यांनी दिल्लीला हरवून दुसऱयांदा रणजी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय. रणजीच्या फायनलमध्ये पोहोचण्याची बंगालची ही 14 वी खेप ठरलीय. त्यांना 2005 साली उत्तर प्रदेश तर 2006 साली मुंबईकडून हार सहन करावी लागल्यामुळे उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.
गुजरातला विजयासाठी हव्यात 320 धावा
गुजरातला रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 320 धावांची आवश्यकता आहे. अर्पित वसावडा याने 139 धावांची, तर चिराग जानी याने 51 धावांची खेळी साकारल्यामुळे सौराष्ट्राला दुसऱया डावात 274 धावा तडकावता आल्या. चिंतन गजाने 71 धावा देत 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 327 धावांचा पाठलाग करणाऱया गुजरातने चौथ्या दिवसअखेरीस प्रियांक पांचालच्या मोबदल्यात 7 धावा केल्या आहेत.


























































