डिसले गुरुजींचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा, रीतसर परवानगी देण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळविलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (माढा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. परदेशात जाण्यासाठी डिसले गुरुजींना रीतसर परवानगी दिली जावी, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहेत. डिसले सरांनी रीतसर परवानगीसाठी अर्ज केला नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज नाकारण्यात आला होता. मात्र आता प्रक्रियेनुसार अर्ज आल्यावर त्यांची सुट्टी मंजूर होणार आहे.

दरम्यान, शिवसेना नेते, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना-युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे डिसले सरांच्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली. डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणि त्यांच्या रजेबाबत चाललेला वाद हे चित्र शिक्षण विभागासाठी खेदजनक असल्याचे युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सांगितले.

‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्यापासून मला नाहक त्रास दिला जात असल्याचे रणजितसिंह डिसले यांनी सांगितले.

डिसले गुरुजींवर 2017 साली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण पेंद्र येथे प्रतिनियुक्तीवर असताना सतत तीन वर्षे गैरहजर असल्याचा आरोप आहे. तसा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण पेंद्राच्या प्राचार्यांकडून शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्याकडे आला आहे.