
वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बिल्डर संजय पुनामिया आणि सुनील जैन यांच्याशी संगनमत करून कायद्याचा धाक दाखवत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह, उपायुक्त अकबर पठाण तसेच अन्य पोलीस अधिकाऱयांनी खंडणी उकळल्याचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी संजय पुनामिया आणि सुनील जैन यांना आज सकाळी अटक केली.
भाइंदर येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल (57) यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमबिर सिंह, अकबर पठाण यांच्यासह अन्य चार पोलीस अधिकारी तसेच बिल्डर संजय पुनामिया आणि त्याचा सहकारी सुनील जैन यांच्या विरोधात विविध कलमांन्वये बुधवारी रात्री उशिरा मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुनामिया याने परमबिर सिंह यांच्याशी संगनमत करून मला खोटय़ा गुह्यांमध्ये अडकवले. माझ्यावर चुकीच्या कारवाया केल्या आणि त्या माध्यमातून मला व माझ्या कुटुंबीयांना धमकावून कोटय़वधी रुपयांची खंडणी वसूल केली असे श्यामसुंदर अग्रवाल यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अग्रवाल यांचा एकेकाळचा बांधकाम व्यवसायातील पार्टनर आणि नंतर विभक्त झालेला संजय पुनामिया आणि त्याचा सहकारी सुनील जैन यांना आज सकाळी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. दोघांनाही किल्ला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार परमबिर यांनी पदाचा गैरवापर करीत कायद्याचा धाक दाखवून आपल्या सहकाऱयांकरवी कोटय़वधी रुपये उकळले. तसेच अकबर पठाण यांनी भीती दाखवत खंडणी उकळली आहे. शिवाय संजय पुनामिया हा स्वतःला परमबिर सिंग यांचा खास दोस्त असल्याचे सांगून धमकावतो. त्याच्याविरोधातदेखील गुन्हे दाखल असल्याचे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. दोघा आरोपींना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधातही अनेक गुह्यांची नोंद आहे.































































