शेर की दहाड है! दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचा ‘रॅप साँगने’ प्रचाराची धूम

सामना ऑनलाईन । मुंबई

निवडणुकीच्या प्रचारासाठी पथनाटय़े आणि गाणी वापरण्याच्या पारंपरिक प्रथेला महायुतीचे स्मार्ट उमेदवार राहुल शेवाळे यांनी मागे टाकले आहे. शेवाळे यांच्या धारावीतील चाहत्यांनी त्यांच्या कामाची माहिती देणारे एक रॅप साँग तयार केले आहे. ‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’ असे बोल असणारे हे रॅप गाणे सध्या धारावीच्या गल्ल्यांमध्ये चांगलेच गाजत आहे.

धारावीतील 26 वर्षांचा जाफर शहा व 21 वर्षांच्या संजय नागपाल या दोघा तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि मुंबईकरांवर काही रॅप गाणी बनविली आहेत. दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे 2014 च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर खासदार म्हणून त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांनी हे दोन तरुण प्रभावित झाले. यातूनच शेवाळेंवर रॅप गाणे तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांच्या कामाची माहिती या रॅप गाण्याच्या माध्यमातून आता घराघरात पोहचत आहे.

संगीत महोत्सवातून संकल्पना
गेल्या वर्षी आम्ही धारावीतील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘आय एम धारावी’ नावाचा महोत्सव आयोजित केला होता. तेव्हापासून धारावीतील कलाकारांशी संबंध आला. या तरुणांनी माझ्यावरील विश्वास आणि प्रेमापोटी बनविलेले हे गाणे हल्ली चांगलेच गाजतेय असे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे म्हणाले तर राहुल शेवाळेंसारख्या तरुण आणि स्मार्ट लोकप्रतिनिधीसाठी आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन हे गाणे तयार केले आहे. राहुल शेवाळे यांच्या कार्याला सामान्य जनतेने दिलेली पोचपावती आहे, असे रॅप गायक जाफर शहा म्हणाला.