दरवर्षी बलात्कारी गुरमीत राम रहीमला मंजूर होतोय 100 दिवसांचा पॅरोल

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकार हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम हा 40 दिवसांच्या पॅरोलसाठी तुरुंगातून बाहेर आला आहे. 5 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता त्याची जेलमधून सुटका करण्यात आली. राम रहिम याला गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी तीन वेळा पॅरोल मंजूर केला जात आहे. 2023 ते 2025 या तीन वर्षात राम रहिम हा दरवर्षी शंभर दिवस तुरुंगातून बाहेर होता असे समोर आले आहे. तसेच यंदा 2026 ची सुरुवात देखील त्याची 40 दिवसांच्या पॅरोलने झाली आहे.

त्याच्या पॅरोलच्या इतिहासाकडे पाहिले तर गुरमीत राम रहीम 24 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्यांदा एका दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आला. 21 मे 2021 रोजी आजारी आईला भेटण्यासाठी 12 तासांची पॅरोल देण्यात आली. 7 फेब्रुवारी 2022 रोजी 21 दिवसांची, जून 2022 मध्ये 30 दिवसांची, 14 ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांची पॅरोल त्याला मिळाली. त्यानंतर 21 जानेवारी 2023 रोजी 40 दिवस, 20 जुलै 2023 रोजी 30 दिवस, 21 नोव्हेंबर 2023 रोजी 21 दिवस, 19 जानेवारी 2024 रोजी 50 दिवस, 13 ऑगस्ट 2024 रोजी 21 दिवस, 2 ऑक्टोबर 2024 रोजी 20 दिवस, 28 जानेवारी 2025 रोजी 30 दिवस, 9 एप्रिल 2025 रोजी 21 दिवस आणि 5 ऑगस्ट 2025 रोजी 40 दिवसांच्या पॅरोलवर त्याची सुटका करण्यात आली होती.