
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
जंगल तोड आणि डोंगर उत्खननामुळे वन्यजीवांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची नेहमी ओरड असतानाच आत्ता या डोंगर आणि जंगलात राहणारे साप आणि सरपटणारे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील तारा येथे अशाच प्रकारे खोदकाम करताना जेसीबीमुळे एक भला मोठा साप (नाग) जखमी झाला. उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ मनोज भद्रे यांनी या नागावर प्राथमिक उपचार केले मात्र त्याच्या जखमा मोठ्या असल्यामुळे या नागाला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले.
गुरूवार चिरनेर येथील सर्प मित्र जयवंत ठाकूर यांना तारा येथून साप असल्याचा फोन आला होता. जयवंत आपल्या साथीदारांसह तारा गावात गेल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेतील हा नाग आढळला. त्यांनी ताबडतोब या नागाला उरण येथे उपचारासाठी आणले होते. त्याच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.




























































