काँग्रेसला मोठा धक्का; नाव जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्याने मैदान सोडले, लढण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख राशिद अल्वी यांनी मैदान सोडत निवडणूक लढवण्यास नकार दिला. अल्वी यांच्या या निर्णयानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. यानंतर तात्काळ त्यांच्या जागी नवीन उमेदवार जाहीर करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राशिद अल्वी यांना अमरोहा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु वैयक्तीक कारणांचा हवाला देत अल्वी यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. तसेच तिकिट मिळण्यास उशिर झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये होती. दरम्यान, अल्वी यांच्या जागी सचिन चौधरी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

अमरोहा मतदार संघामध्ये 18 एप्रिलला मतदान होणार आहे. शनिवारी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमधील महत्त्वाची अमरोहा येथील जागा राशिद अल्वी यांना देण्यात आली होती. भाजप आणि सपा-बसपाच्या आघाडीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तगडा उमेदवार दिल्याची चर्चा होती. सपा-बसपाचे उमेदवार दानिश अली यांच्यात आणि राशिद अल्वी यांच्या घासून लढत होणार असेही बोलले जात होते. परंतु नाव जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्वी यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे सांगितल्याने काँग्रेसला झटका बसला.

यूपी काँग्रेसमध्ये नाराजांची भरती
प्रियंका गांधी-वढेरा यांना सरचिटणीसपद दिल्यानंतर तसेच उत्तर प्रदेशची धुराही त्यांच्याकडे सोपवल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल अशी शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केली होती. परंतु यूपी काँग्रेसमध्ये एकामागोमाग एक नेते नाराज होत असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतल्याचे वृत्त होते, परंतु त्यांनी यास दुजोरा दिला नाही. आता ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी निवडणूक लढणार नसल्याचे म्हटल्याने नाराजांची मनधरणी करण्यास वेळ नसल्यने काँग्रेसपुढील आव्हान वाढले आहे.