
सामना प्रतिनिधी। किल्लारी
किल्लारीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यास राज्य सरकार उदासीन दिसत असल्याने याबाबतीत तात्काळ विचार करावा अन्यथा २५ जुलै रोजी रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.
शनिवारी किल्लारीच्या प्रांगणात कारखाना बचाव कृती समितीने शेतकरी ऊस उत्पादक, सभासद, व्यापारी यांची बैठक आयोजित केली होती. अवघ्या साडेतीन कोटी रुपयाच्या कर्जात असलेल्या कारखान्यावर शासन दरबारी विचार केला जात नसून हजारो कामगारांना देशोधडीस लागले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य बँकने तात्काळ निविदा प्रक्रिया सुरु करुन याबाबत सकारात्मक पावले उचलावीत. तसेच पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन या कारखान्याकडे पहावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्याने या कारखान्याची पाहणी केली होती. पण पुढे काहीच होत नसल्याने सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी यावेळी सभासदांनी केली.
या बैठकीस औसा, निलंगा, उमरगा तालुक्यातील अनेक सभासद, ऊस उत्पादकांनी हजेरी लावली होती. यावेळी २५ जुलै पासून या परिसरात तीव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशा आशयाचे निवेदन तयार करण्यात आले. दरम्यान, “हा कारखाना महाराष्ट्रातील सर्वात कमी कर्जात असल्याने सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारने याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असून कारखान्यावरील बोर्ड हे भाजपाचे असलेल्या त्यांनी ठरवले तर हा कारखाना चालू होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार माणिकराव जाधव यांनी दिली”.




























































