रतनवाडी परिसराने ओलांडला 2 हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग आठवडाभरापासून अकोले तालुक्यातील आदिवासी भागातून पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू आहे. परिसरातील डोंगरांवरून शेकडोंच्या संख्येत धबधबे ओसंडून वाहत आहेत. या पावसाळ्यातील हे अतिशय विलोभनीय निसर्गसुंदर दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रतनवाडी परिसराने बुधवारी या पावसाळ्यातील 2 हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला. बुधवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत रतनवाडीत 93 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू असून, भंडारदऱयाचा जलसाठा झपाटय़ाने वाढत आहे. मुळा खोऱ्यातही जोरदार पाऊस आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणात नवीन पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. संततधार पाऊस व जोरदार पर्जन्यवृष्टी अशीच सुरूच आहे. या हंगामातील भाताच्या आवण्या पूर्ण करण्यात येत आहेत. आदिवासी भागातील बहुतांश शेतकरीवर्गाने कमी पावसामुळे धूळ वाफ्यावरच भाताची पेरणी उरकून घेतली. त्यांना या पावसामुळे जीवदान मिळाले. आदिवासीबहुल भागाच्या तुलनेत तालुक्यातील बिगर आदिवासी भागातून पावसाचे प्रमाण अत्यल्प होते, पण आता सरीवर सरी कोसळत आहेत. खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस सर्वत्र झाला असून, सभोवताल हिरवाई दिसू लागली आहे.

आदिवासीबहुल परिसरातून कातळकडय़ावरून मंत्रमुग्ध होऊन शुभ्रधवल प्रपात जमिनीवर कोसळत आहे. हजारो लोक येथे पर्यटनासाठी आले आहेत. दाट धुक्यातून वाट शोधत ते अनोख्या पर्यटनाचा आनंद घेत आहेत. या पावसाळ्यात 1 जूनपासून आतापर्यंत घाटघर 1874, रतनवाडी 2015, भंडारदरा 1239, वाकी 909, निळवंडे 590, अकोले 296, आढळा 135 मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. भंडारदऱयात गेल्या 12 तासांत 75 मिलीमीटर पाऊस झाला असून, 366 दलघफू नवीन पाणी आले.