
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात रविवारी दहीहंडीचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. गोविंदांनी दहीहंडी फोडत एकच जल्लोष केला. यावेळी बाळगोपाळांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्याचा आनंदही लुटला.
कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेत विद्यार्थ्यांवर हिंदुस्थानी संस्कृतीचे संस्कार व्हावेत या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षीही दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील 650 विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्य केले. सकाळी 8 वाजल्यापासून शाळेत दहीहंडीची तयारी सुरू झाली होती. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बालगोपाळांनी गोविंदाच्या तालावर नृत्य सुरू केले.
राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बच्चेकंपनी नटूनथटून आली होती. मुलींच्या टिपरीनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दोन-तीन थरांवर हंडी फोडली.
आगाशे विद्यामंदिरात कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. दहीहंडीच्या कार्यक्रमात नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व पालकांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. दहीहंडी सजावट, बांधणी, प्रसाद या सर्व कामात पालकांनी सक्रिय भाग घेतला. पालक प्रतिनिधी, रिक्षावाले काका हे सुद्धा या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते.

































































