कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टी थ्री सूत्राचा वापर करणार

>> दुर्गेश आखाडे

रत्नागिरी जिह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवसाला दहा हजार कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जिह्यात टेस्ट, ट्रक आणि ट्रीट या टी थ्री त्रिसूत्रीचा वापर करण्यात येत असून त्याचे परिणामही दिसून येत आहेत. यापूर्वी जिह्याचा आठवडय़ाचा पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के होता तो आज 6 टक्क्यांवर आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच डॉ. पाटील यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ मोहीम हाती घेतली. या मोहिमेत दररोज सायंकाळी 6 वाजता कोरोनामध्ये काम करणारे डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱयांकडून ऑनलाइन बैठकीत ते आढावा घेतात. मास्क न वापरणाऱयांवर कारवाई सुरू केली असून दर आठवडय़ाला कारवाईचा आढावा घेतला जाईल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांनी सहभाग दाखवल्यास कोरोना लवकर आटोक्यात येईल अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

  • खासगी कोविड सेंटरमधून होणाऱया लुटमारीकडे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गांभीर्याने पाहिले आहे. रुग्णांची बिले प्रशासनाने नेमलेल्या ऑडिटरने तपासल्याशिवाय त्या रुग्णाला डिस्चार्ज देऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे.
  • तिसऱया लाटेचा धोका ओळखून ऑक्सिजन पार्लर उभारणार आहोत. 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांत हवेत ऑक्सिजन घेण्याची यंत्रणा राबवणार आहोत. 6 ठिकाणी ऑक्सिजन टँक बसवणार आहोत. सध्या आपल्याकडे 400 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आहेत. अजून 250 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध झाले असून गरजेप्रमाणे त्याचे वितरण होणार आहे. तिसरी लाट लक्षात घेता जिह्याला 88 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून आपल्याकडे 99 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या