रत्नागिरी – ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटवर तीन चिमुकल्यांची मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित बालकांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला होता. या तीनही बालकांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात केली आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार पहायला मिळाला आहे. साधारण 2908 लहान मुले कोरोनाबाधित झाली आहेत आणि या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. जून महिन्यामध्ये 70 हून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहेत.

संगमेश्वर तालुक्यात 9 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. यामध्ये एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या 8 रुग्णांमध्ये 3 लहान मुलेही होती. या तीन लहान मुलांनी कोरोनावर मात केली.

सध्या महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असू शकते असा तज्ञांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिलपासूनच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळाला आहे. आतापर्यंत 3 हजार मुलांना कोरोना झाल्याची माहिती पुढे आली आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीत स्वस्तिक हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि महिला रुग्णालय येथे कोविड बाल रुग्णालय आणि कोविड बाल रुग्ण कक्ष उभारण्यात आलेले आहेत.

‘रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 9 रुग्ण सापडले असून आम्ही 117 नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल आलेला नाही. संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडलेल्या कोरोना रुग्णांमधील 3 लहान मुलांनी कोरोनावर मात केली आहे.’

– डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी