रत्नागिरी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलची बाजी, 7 पैकी 5 जागा जिंकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सात पैकी पाच जागा जिंकून सर्वपक्षीय सहकार पॅनेलने बाजी मारली आहे. बॅंकेच्या 21 संचालकपदांच्या जागांपैकी तब्बल 19 जागा सहकार पॅनेलने जिंकल्या असून त्यापैकी 14 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. डॉ.सोपान शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. बॅंकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या होत्या. एकूण 7 जागांसाठी निवडणूक झाली. 19 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 87.45 टक्के मतदान झाले.

आज रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. त्यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास कार्यकारी सोसायटी संस्था आणि धान्य अधिकोष सहकारी संस्था रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील विजयी झाले. गजानन पाटील यांना 33 मते तर विरूद्ध उमेदवार प्रल्हाद महादेव शेट्ये 8 मते मिळाली.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास कार्यकारी सोसायटी संस्था आणि धान्य अधिकोष सहकारी संस्था लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना 16 मते मिळाली तर विरूद्ध उमेदवार महेश खामकर यांना 18 मते मिळाली. खामकर यांनी तीन मतांनी निसटता विजय मिळवला.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास कार्यकारी सोसायटी संस्था आणि धान्य अधिकोष सहकारी संस्था गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांनी 13 मते मिळवत विजय संपादन केला. विरूद्ध उमेदवार चंद्रकांत धोंडू बाईत यांना 8 मते मिळाली. दुग्धसंस्था,पशुपालन संस्था, वराह पालन संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण 10 मते मिळाली तर विरूद्ध उमेदवार अजित रमेश यशवंतराव यांनी २५ मते मिळवत विजय मिळवला.

नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज 66 मते मिळवत विजय मिळवला. विरूद्ध उमेदवार ॲड.सुजित भागोजी झिमण 56 मते मिळाली. मजूर संस्था, स्वयंरोजगार,बेरोजगार आणि हमाल कामगार सहकारी संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते 48 मते घेत विजयी झाले, विरूद्ध उमेदवार राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते मिळाली. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास सदस्य मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश कांबळे विजयी झाले. सुरेश कांबळे यांना 692 मते मिळाली तर सचिन बाईत यांना 164 मते मिळाली.