
उन्हातान्हात गावभर हिंडत राहाणं, गावाच्या उत्सवात सहभाग घेणं या गोष्टी हरवून आता मुलांचे बालपण मोबाईल स्किनच्या चौकटीत अडकून पडलेले असताना रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे बनवाडी येथील बालगोपाळांनी त्यांच्या आज्या-पंज्यानी सुरू केलेली, आई-वडिलांनी अनुभवलेली शिमग्याची परंपरा जपली आहे. ही आजच्या पिढीतील मुलं ढोल वाजवत संकासूर नाचवत शिमगा साजरा करत आहेत. ”आयना का बायना घेतल्याशिवाय जाईंना” म्हणत बालगोपाळांचा संकासूर शिमग्याची संस्कृती जपत आनंद अनुभवत आहे.
कोकणातील सण ही एक संस्कृती आहे. सणवारांची ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. शिमगोत्सवात आबालवृध्द उत्साहाने सहभागी होतात. गावातील मोठी माणसं शिमगोत्सवाची तयारी करत असताना बालगोपाळ एक पालखी तयार करतात. संकासूराचे सोंग घेतात आणि “आयना का बायना घेतल्याशिवाय जायना गल्ल्यात पैसा दिसतो हायना” असं म्हणत गाव हिंडळतात असं चित्र पूर्वी पहायला मिळत होते. आता मात्र मोबाईलमुळे काही गोष्टी फक्त रिल पुरत्या उरल्या आहेत. बालपण हरवल्याने उत्सवातील यागोष्टींची मजा निघून गेली असं असताना बनवाडीतील बालगोपाळ शिमग्याची ही परंपरा आणि मजा अनुभवत आहेत. कोकणची सण आणि संस्कृती जपण्यासाठी ही नवी पिढी सज्ज आहे.































































