
कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱया या बांधा साहित्य प्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे बांधावरचे संमेलन चिपळूण तालुक्यातील धामवणे गावात रंगले.

संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारूळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळय़ाला प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, चिपळूणचे आमदार शेखर निकम, सुभाष लाड, स्वप्ना प्रशांत यादव, कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश गांधी यांनी खास मालवणी भाषेत गाऱहाणे घातले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण झाले.

संमेलनाध्यक्ष बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना पृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्पृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य पैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील पंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे बारटक्के म्हणाले. डॉ. प्रशांत पटवर्धन उद्घाटनीय भाषणात म्हणाले, आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे.





























































