
जंगलातील देखणा, चपळ बिबट्या आता मानवी वस्तीत शिरकाव करू लागला आहे. बिबट्याचा जंगलातील आधिवास धोक्यात आला आहे. कधी गोठ्यात, कधी दारात, तर तोल जाऊन विहिरीत पडणाऱ्या बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष आता सुरू झाला आहे. हा बिबट्या मानवासमोर मानवाच्या भाषेतच आपली बाजू मांडणार आहे. बिबट्याची लावणी, बिबट्याचे भारूड बिबट्याच्या कव्वालीतून बिबट्या दसऱ्याच्या दिवशी संगीत बिबट आख्यानमधून चिपळूणात संवाद साधणार आहे.
हिंदुस्तानातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले ‘संगीत बिबट आख्यान’ हे धमाल विनोदी नाटक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग मोफत दाखवण्यात येणार आहे. निसर्ग आणि मानवी सहजीवनाचा एक अदृश्य अध्याय उलगडणारे हे नाटक, केवळ मनोरंजकच नव्हे तर विचारप्रवर्तक अनुभव देणारे ठरणार आहे. जंगलातील सर्वाधिक देखण्या आणि गूढ प्राण्यांपैकी एक असलेल्या बिबट्याच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. बिबट्याचे अधिवास, पिलांचे संगोपन, आणि मानवी वस्तीच्या वाढत्या प्रभावामुळे त्याच्या अस्तित्वाला निर्माण होणारे धोके, हे सर्व नाट्यमय पद्धतीने यात गुंफले आहे. हे नाटक बिबट्या आणि मानव यांच्यातील शतकानुशतके चाललेला संघर्ष आणि सहजीवनाचा गुंतागुंतीचा धागा अतिशय संवेदनशीलपणे उलगडणारी ही कलाकृती आहे.
या नाटकाची निर्मिती केवळ मनोरंजनासाठी नसून, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजात गहन जनजागृती निर्माण करणे, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि नैसर्गिक अधिवासांच्या ऱ्हासामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना या गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधून, निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक जबाबदारीने जपण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच बिबट्यावर रचलेली भारुड, बिबट्याची लावणी, कव्वाली, निसर्गाची न नांदी, भैरवी, वन्यजीवांवर आधारित शाहिरी गाणी यांसारखा खजिना आपल्यासमोर उलगडणार आहे. नाट्य प्रयोगाचे नियोजन चिपळूण वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान आणि त्यांचे कर्मचारी करत आहेत. चिपळूणकरांनी हा प्रयोग पहावा असे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई ,सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड यांनी केले आहे.