
प्रेयसीचा खून करणाऱ्या खंडाळा येथील दुर्वास पाटील याने वर्षभरापूर्वी आणखी एका तरूणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पहिला खून पचला असं वाटतं असताना दुर्वास पाटील याने आपल्या प्रेयसीचा खून केला. मात्र पोलीस तपासात पहिला खून उघडकीस आला. खूनामध्ये सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 जून 2024 रोजी रात्री 11 वाजता कपड्यांची बॅग आणायला गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, मृतदेह आंबा घाटात दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मयत झालेला तरुण राकेश अशोक जंगम हा वाटद खंडाळा येथील रहिवासी होता. 6 जून, 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो कपड्यांची बॅग घेऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. बराच काळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा पत्ता न लागल्याने, 21 जून, 2024 रोजी त्याची आई वंदना अशोक जंगम यांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांना काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यांनी मुख्य आरोपी दुर्वास दर्शन पाटील याची चौकशी सुरू केली. कसून चौकशी केल्यावर त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.
दुर्वासने त्याचे साथीदार विश्वास विजय पवार आणि निलेश रमेश भिंगार्डे यांच्या मदतीने राकेशचा खून केला आहे. आरोपींनी राकेशला खंडाळा येथून कोल्हापूरला जायचे आहे असे सांगितले आणि त्याला दुर्वासच्या सियाज गाडीतून सोबत घेतले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवासादरम्यानच, त्यांनी अज्ञात कारणावरून राकेशचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला.
पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोपींना अटक केली. आरोपी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खुनाचा गुन्हा), 201 (पुरावा नष्ट करणे), आणि 34 (सामूहिक सहभाग) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, खुनामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास करत आहेत.