
दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 22 लाख 92 हजार रूपये किंमतीचे चरस सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात ही तिसरी मोठी कारवाई आहे. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत केळशी किनारा मोहल्ला येथील अब्रार ईस्माइल डायली (32) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीत चरस सापडले. सुमारे चार लाख रूपये किंमतीचे हे चरस होते. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, चरस केळशी मोहल्ला येथील अकिल अब्बास होडेकर (45) याने विक्रीसाठी अब्रारकडे दिला होता. अकिल होडेकर याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने चरसच्या चार पिशव्या मंडणगडातील समुद्रकिनाऱ्यावरील झुडपात लपवल्याचे सांगितले.
पोलिसांनी साखरी येथीस समुद्रकिनाऱ्यावर जाऊन चरस जप्त केले. त्या पिशवीत 18 लाख 92 हजार 400 रूपयांचे 4 किलो 731 ग्रॅम चरस सापडले. संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 22 लाख 92 हजार 400 रूपयांचे 5 किलो 729 ग्रॅम चरस जप्त केले आहे. याप्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे आढळल्याने पोलिसांनी ताबीस महमूद डायली (30) याला ताब्यात घेतले असून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.