Ratnagiri News – संगमेश्वरमधील बेपत्ता महिलेची चप्पल, पर्स चिपळूणमध्ये आढळली; आत्महत्या, घातपात की बनाव?

संगमेश्वर येथील बेपत्ता महिलेची चप्पल, पर्स चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अपेक्षा अमोल चव्हाण असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. अपेक्षा घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर येथील रहिवासी असलेली अपेक्षा अमोल चव्हाण ही मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. तिच्या पतीने, अमोल चव्हाण यांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता, तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधरेश्वर पुलावर दिसून आले.

या माहितीनंतर, अपेक्षाचे कुटुंब तातडीने गांधारेश्वर पुलावर पोहोचले. तिथे त्यांना पुलावर अपेक्षाची चप्पल आणि पर्स सापडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या महिलेने खरोखरच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली की, आत्महत्येचा बनाव करून ती जवळच्या रेल्वे स्टेशनवरून दुसऱ्या ठिकाणी निघून गेली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.