
राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे घडलेल्या गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि घरफोडीचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राजापूर परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण निवळण्यास मदत झाली आहे.
ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. राजापूर तालुक्यातील मौजे कोळवणखडी, खालची मोरेवाडी येथे राहणारे ५५ वर्षीय सदानंद शांताराम मोरे यांच्या घरात चार अज्ञात इसमांनी अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला होता. यातील दोघांनी किचनच्या खिडकीतून तर दोघांनी मुख्य दरवाजातून घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चोरट्यांनी घरातील पैसे साठवण्याचा डबा पळवण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोरे कुटुंब प्रचंड भयभीत झाले होते आणि संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सदानंद मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांचा वापर करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथील सुनील पवार आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती समोर आली.
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलिसांची संयुक्त पथके धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात रवाना झाली होती. दरम्यान, २१ डिसेंबर २०२५ रोजी संशयित आरोपी सुनील पवार आणि त्याचे साथीदार इंदापूर हायवेवर येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील भीमा पवार (वय २७, रा. पारधी वस्ती, मोहा, जि. धाराशिव) आणि अजय उत्तरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, लाखनगाव, जि. धाराशिव) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

























































