Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये पती-पत्नीच्या बँक खात्यातून 2.14 लाख लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजिटल युगात ऑनलाईन चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. संगमेश्वरमध्ये एका किराणा व्यवसायिकाला सायबर चोरांनी मोठा आर्थिक फटका दिला आहे. बँक ऑफ इंडिया (शाखा संगमेश्वर) मधून अज्ञात आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल 2,14,148 रुपये ऑनलाईन पद्धतीने चोरून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तौफिक जिकर मेमन यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तौफिक मेमन यांचे संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. अज्ञात आरोपीने काहीतरी आमिष दाखवून किंवा सायबर क्लृप्त्यांचा वापर करून तौफिक यांच्या बँक खात्यातून 89,149 रुपये आणि त्यांची पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या बँक खात्यामधून 1,24,999 रुपये असे एकूण 2,14,148 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेमन यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसून पोलीस पुढील तपास करत आहे.कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला बँक पिन किंवा पासवर्ड शेअर करू नका. बँकेकडून किंवा लॉटरी लागल्याचे सांगणारे फेक कॉल्स आणि मेसेजपासून सावध रहा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवा.