
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील मुद्दस्सर खलपे यांच्या घराला शनिवारी रात्री भीषण आग लागली. संपूर्ण घर आगीत भस्मसात झाले. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी घरातील सर्व सामान जळून खाक झाल्याने खलपे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सैतवडे बोरसई मोहल्ला येथे मुद्दसर खलपे यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट,एनर्जी,चोघुले कंपनी येथील अग्निशमन दल,जयगड खंडाळा पोलीस,सैतवडे सरपंच सागर कदम,गुंबद सरपंच उषा सावंत,मुनाफ वागळे,अजिम चिकटे,साजिद शेकासन,अनिकेत सुर्वे,बानू खलपे,राजेश पालशेतकर,गावातील सर्व तरुण कार्यकर्ते आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते.या ठिकाणी बंब बोलावून आग आटोक्यात येईपर्यंत स्वतः जि.प.सदस्या ऋतुजा जाधव उपस्थित होत्या.त्यांनी ही घटना ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत व रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव यांचे बरोबर रात्रीच फोनवर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले व खलपे कुटूंबियांना मदत देण्याच्या मागणी केली आहे.ही घटना खूपच दुर्दैवी होती. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे.



























































