
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेना -राष्ट्रवादी कॉंग्रेस – काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत गावपॅनलला ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गावपॅनलचे सर्व उमेदवार सरपंच पदासह मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास गावपॅनलचे समन्वयक रज्जाक काझी यांनी व्यक्त केला आहे.
रज्जाक काझी म्हणाले की, मी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच असताना गावामध्ये साडेपाच कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. ही विकासकामे आमच्यासाठी पोचपावती आहेत. सरपंच पदाच्या उमेदवार फरिदा काझी यांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही केलेल्या विकासकामांमध्ये जनता आमच्या पाठीशी आहे. गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न, रस्त्याची कामे, स्वच्छतेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया रज्जाक काझी यांनी दिली. सध्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. या निवडणूकीत सरपंचासह गावपॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास रज्जाक काझी यांनी व्यक्त केला.
































































