‘योजक’ उद्योग समूहाचे संस्थापक नानासाहेब भिडे यांचे निधन

1284
फोटो सौजन्य - eyojak.com

रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘योजक’ उद्योग समूहाचे संस्थापक नानासाहेब भिडे यांचे शनिवारी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानीच त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक म्हणून नानासाहेबांनी नावलौकीक मिळवला होता.

गोखले नाक्यावरील भिडे उपहारगृह त्यांनी अनेक वर्षांपूर्वी सुरू केले होते. कोकणातील पदार्थांना मान्यता मिळावी ते प्रसिद्ध व्हावेत यासाठी मनापासून काम करणाऱ्या नानासाहेबांनी योजक उद्योग समूहाची स्थापना केली. आंबा ,काजू ,करवंदे कोकम यावरील प्रक्रिया उद्योग त्यांनी मोठ्या कष्टाने उभारला होता. ‘योजक’ची उत्पादने ही फक्त राज्यात, देशातच नाही तर विदेशात प्रसिद्ध झाली असून त्याला मोठी मागणी आहे.

आजमितीला कोकणात येणारी व्यक्ती योजकची एकतरी उत्पादन घेतल्याशिवाय परत जात नाही, ही नानासाहेबांनी केलेल्या कष्टाची पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही. नानासाहेबांच्या पश्चात आनंद, श्रीकांत ,किशोर या त्यांच्या मुलांनी योजकचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. प्रसिद्ध गायिका शमिका भिडे ही नानासाहेब यांची नात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या