रत्नागिरी – जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढविण्यावर भर, बंद पडलेल्या शाळा भाडेतत्वावर देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्ष होण्याची संधी मला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे मिळाली. मिळालेल्या एक वर्षाच्या कालावधीत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात विकासकामे करू शकलो.जिल्हापरिषदेच्या इमारतीसाठी 58 कोटी 57 लाख रूपयांचा निधी,प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 57 रूग्णवाहिका, नवोदय विद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे यासारखी महत्वाची कामे करता आल्याची माहिती जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हापरिषदेच्या बंद शाळा भाडे तत्वावर देणे, जिल्हापरिषदेच्या मोक्याच्या जागांवर जाहिराती करणे आणि टिआरपी येथील जिल्हापरिषदेच्या जागेवर रेस्ट हाऊस उभारून जिल्हापरिषदेचे उत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजना करण्याचे नियोजन आम्ही केल्याचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले.

अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, 21 मार्च 2017 रोजी सुरू झालेला जिल्हापरिषदेचा कार्यकाल आज 20 मार्च 2022 रोजी संपत आहे. मला अध्यक्षपदाचा 364 दिवसांचा कार्यकाल मिळाला. याकाळात आम्ही महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये जिल्हापरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 58 कोटी 57 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. या कामाला प्रारंभही झाला आहे. राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात जिल्ह्याबाहेरील मुलांना प्रवेश दिला जात होता. मी स्वत: नवोदय विद्यालयाला भेट दिली. आम्ही नवोदय विद्यालयातल स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात बाबतचा निर्णय घेतला. यंदा जिल्ह्यातील 40 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामध्ये 20 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील आहेत असे जाधव यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिकेची गरज होती आम्ही 57 रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते ते मिळवून देण्यासाठी पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. ते 21 लाख रूपये मिळाल्याने जिल्हापरिषदेवरचा भार कमी झाला. जलजीवन मिशन सारखी योजना राबविण्याचा प्रयत्न करत योजनेची 100 कोटी रूपये निधीची मंजुरी दिली. जिल्हापरिषदेची थकीत रक्कम 10 ते 12 कोटी रूपये होती ती पुन्हा जिल्हापरिषदेला मिळवून देण्यात यश आले. जनांसाठी येणाऱ्या निधीतून व्याज मिळते ती व्याजाची रक्कम जिल्हापरिषदेचे उत्पन्न म्हणून आपण वापरतो ती सुमारे साडे आठ कोटी रूपयांची रक्कम अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ती रक्कम परत मिळवली.

जिल्हानियोजन कडून येणाऱ्या निधीवर आम्ही दोन टक्के सादिल निधी घेतो त्यात वाढ करून चार टक्के करण्यात आला आहे. त्या निधीतून एक मॅकनिकल आणि इलेक्ट्रीक अभियंता पद आम्ही भरणार आहोत सध्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू झाल्याने त्याठिकाणी तीन सुरक्षारक्षक आम्ही नेमणार आहोत. उपाध्यक्ष उदय बने यांनी सुचविल्याप्रमाणे टेस्टींग रिपोर्ट करणारी प्रयोगशाळा रत्नागिरीत सुरू करणार असून दुसऱ्या टप्प्यात चिपळूण येथे एक प्रयोगशाळा सुरू करू असे विक्रांत जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, शिक्षणसभापती चंद्रकांत मणचेकर, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर उपस्थित होते.