
प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा सोमवार 17 मे रोजी पहिला स्मृतिदिन. गेल्या वर्षी कोरोनामुळे मतकरी यांचे निधन झाले. नाटय़ क्षेत्रासाठी हा मोठा धक्का होता. सतत नवनिर्मितीचा ध्यास असलेले मतकरी अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने अनेक गोष्टी अपुऱया राहिल्या होत्या. त्यातील दोन त्यांच्या स्मृतिदिनी पूर्ण होणार आहेत. ‘लोककथा-78 आणि त्याविषयी सर्व काही’ आणि ‘संवाद… रत्नाकर मतकरींशी’ या पुस्तकांचे प्रकाशन उद्या होणार आहे.
दोन्ही पुस्तकांत मतकरी यांचा सुरुवातीपासून सहभाग होता. पॉप्युलर प्रकाशनच्या फेसबुक पेजवर सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम बघता येईल. रामदास भटकळ, श्रीकांत बोजेवार, विजय पेंकरे, हेमंत कर्णिक आणि सुप्रिया विनोद या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
‘लोककथा-78’ या एक वेगळा आशय आणि मूल्य असलेल्या नाटकाचा गौरव आणि त्याचबरोबर पुढच्या पिढय़ांना त्याचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने त्याचे दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे पॉप्युलर प्रकाशनाने सांगितले. सदामंगल पब्लिकेशचा ‘संवाद… रत्नाकर मतकरींशी’ हा त्यांच्या अनेक वर्षांमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या मुलाखतींचा संग्रह आहे. त्याचे संपादन हेमंत कर्णिक आणि प्रज्ञा जांभेकर यांनी केले आहे. अनेक मान्यवरांनी घेतलेल्या मतकरींच्या मुलाखतींचा समावेश या पुस्तकात आहे.
नव्या संहितेची भर
‘लोककथा-78’ हे नाटक 42 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. नाटकातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यामुळे बरेच चर्चेत आले. ‘लोककथा-78’ या नाटकातील आशय आजही तसाच आहे. नाटकाचे मराठी, हिंदी, बंगालीत अनेक प्रयोग झाले. नाटक रंगमंचावर आले तेव्हा त्यातील केसचा निकाल लागलेला नव्हता. तो लागल्यावर तो भाग मतकरी यांनी लिहून काढला. ही नव्याने वाढवलेली संहिताही ‘लोककथा-78 आणि त्याविषयी सर्वकाही’ पुस्तकात आता समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर लोककथेवर लिहून आलेले लेख, प्रतिक्रिया, समीक्षा हा सगळा दस्ताऐवज पुस्तकरूपात येणार आहे. पुस्तकाचे संपादन प्रतिभा मतकरी यांनी केले आहे.



























































