प्रेसिडंट ट्रम्प यांचे कुणीही मित्र नाही, अनेक देशांत त्यांनी मांडलिक आणि गुलाम नेमले आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने जनतेला नामर्द आणि षंढ बनवण्याचं काम केलं आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच प्रेसिडंट ट्रम्प यांचे कुणीही मित्र नाही, अनेक देशांत त्यांनी मांडलिक आणि गुलाम नेमले आहेत असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रेसिडेंट ट्रम्पला कोणीही मित्र नाही. त्यांनी सगळे गुलाम आणि मांडलिक नेमलेले आहेत. अनेक देशांमध्ये त्यांनी अशा प्रकारचे लोक नेमले आहेत. अमेरिकेची जनता जर रस्त्यावर उतरली असेल, तर त्यांच्या साहसाचं, धाडसाचं आणि मर्दानगीचं अभिनंदन केलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने जनतेला धर्माची अफूची गोळी देऊन बधीर केलं आहे. त्या बधीरतेतून जनतेने बाहेर यायला हवं. इथेही मनमानी झुंडशाही सुरू आहे आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे उघड्या डोळ्यांनी पाहून जनतेने जागरूक व्हायला हवं असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

यापूर्वीही जनता रस्त्यावर उतरली आहे. स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणिबाणीच्या काळातील दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई—या सर्व वेळी जनता उभी राहिली. पण गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने जनतेला नामर्द आणि षंढ बनवण्याचं काम केलं आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.