राणा दांपत्याला अटक; बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध शिवराळ भाषा वापरली! सर्वत्र संताप!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असे सांगणाऱया नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्याला आज शिवसैनिकांनी चांगलाच दणका दिला. शिवसैनिकांचा जागता पहारा आणि त्यांचा रुद्रावतार पाहून राणा दांपत्य आज घरातून बाहेरच पडले नाही. आंदोलन मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र चिथावणी देणारी विधाने करून शांतता बिघडवल्याबद्दल खार पोलिसांनी दोघांनाही अटक केली. संतप्त शिवसैनिकांच्या गराडय़ामधून मार्ग काढत पोलिसांना राणा दांपत्याला गाडीतून चादरीच्या आडोशाने पोलीस ठाण्यात न्यावे लागले.

भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असे जाहीर केल्यानंतर हे दांपत्य अमरावती येथून शुक्रवारी मुंबईत पोहोचले. तत्पूर्वीच हजारो शिवसैनिक, युवासैनिक ‘मातोश्री’बाहेर जमले होते. राणा दांपत्याच्या निषेधाने त्यांनी परिसर दणाणून सोडला. रात्रभर शिवसैनिक डोळय़ात तेल घालून तिथे पहारा देत होते.
राणा दांपत्याने आंदोलन मागे घेतले

शिवसैनिक मागे हटण्यास तयार नाहीत. ते आक्रमक होत आहेत हे पाहिल्यानंतर राणा दांपत्याने दुपारी 2.40 वाजता फेसबुक लाईव्ह करीत आपण आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौऱयावर येत असल्याने त्यांच्या या दौऱयाला कुठलेही गालबोट लागू नये तसेच कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असे कारण राणा दांपत्याकडून देण्यात आले.

ढोलताशांच्या गजरात शिवसैनिकांचा जल्लोष
आंदोलन मागे घेतल्याचे राणा दांपत्याने जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शिवसैनिकांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे सकाळपासून ‘मातोश्री’वर असलेले शिवसैनिकही खार येथील त्या इमारतीसमोर पोहोचले. ढोलताशांच्या गजरात शिवसैनिकांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत एकच जल्लोष केला.

राणा दांपत्य एकाकी पडले
राणा दांपत्य यांना मुंबईत भाजप कार्यकर्त्यांची कुमक आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येतील अशी अपेक्षा होती. भाजप कार्यकर्त्यांची ते आतुरतेने प्रतीक्षा करत होते, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. मीडियावर प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त भाजपचा एकही नेता किंवा कार्यकर्ता राणा दांपत्याजवळ प्रत्यक्ष फिरकला नाही. ‘मातोश्री’ किंवा खार येथील त्यांच्या निवासस्थानीही भाजपवाले कुणी आले नाही. त्यामुळे राणा दांपत्य एकाकी पडले अशी चर्चा होती.

राणा दांपत्याला पोलिसांनी घरातून उचलले
खार पोलीस राणा दांपत्याच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांबरोबर त्यांनी अरेरावी केली. तुम्ही वॉरंट आणले का… आमदार, खासदारांशी असे वागले जाते का? तुम्ही घराबाहेर व्हा अशी अरेरावीची भाषा त्यांनी वापरली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच फेसबुक लाइव्हद्वारे बडबड करणारे राणा दांपत्य ताळय़ावर आले. सहाव्या मजल्याच्या लिफ्टमधून पोलिसांसोबत खाली उतरले. यावेळी पोलिसांनी या दांपत्याला त्यांच्या खासगी गाडीऐवजी पोलीस व्हॅनमधून खार पोलीस ठाण्यात यायला सांगितले. या दांपत्याला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधूनच त्यांची रवानगी खार पोलीस ठाण्यात करण्यात आली.

पोलीस घेऊन जात असताना नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसेनेबद्दल अपशब्द काढले असा आरोप आहे. अगदी पोलीस ठाण्याच्या पायऱयांवरही राणा दांपत्य हातवारे करत शिवसेनेच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध शिवराळ भाषा वापरल्याबद्दल राज्यभरातील शिवसैनिकांमध्येच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांवर जीवापाड प्रेम करणाऱया मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

गुन्हा दाखल, रात्र पोलीस ठाण्यातच
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दांपत्याविरोधात 153 अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलिसांशी हुज्जत घालणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे ही कलमे राणा दांपत्याला लावण्यात आली आहेत. उद्या रविवारी सुट्टीकालीन कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार असून तोपर्यंत म्हणजे शनिवारची रात्र त्यांना पोलीस ठाण्यातच काढावी लागणार आहे.

अमरावतीत पोहोचवण्यासाठी ऍम्ब्युलन्स
राणा दाम्पत्याला अमरावतीत पोहोचवण्यासाठी ते राहत असलेल्या इमारतीसमोर शिवसैनिकांनी ऍम्बुलन्सच उभी केली. त्यांच्यासाठीच ही ऍम्ब्युलन्स राखीव असून दोघे खाली आल्यानंतर त्यांना याच ऍम्ब्युलन्समधून अमरावतीत सुखरूप पाठवणार असल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले.

खारमधील राणांच्या घराबाहेरच ठिय्या
‘मातोश्री’वर पोहोचण्यापूर्वीच राणा दांपत्याला खार येथील ‘ह. मु.’ इमारतीमधील त्यांच्या निवास- स्थानाजवळच रोखण्यासाठी शिवसैनिकांनी तिथेही ठाण मांडले होते. शनिवारी सकाळी 9 वाजताची वेळ राणा यांनी जाहीर केली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. त्यात महिला शिवसैनिकांची संख्या मोठी होती. संतप्त शिवसैनिकांनी राणा दांपत्याचा निषेध नोंदवताना ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना फायर है, रवी राणा कायर है’ अशा घोषणा दिल्या.

सोमय्यांना ‘प्रसाद’
किरीट सोमय्या संध्याकाळी राणा दांपत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात पोहोचले. भेट घेऊन सोमय्या निघाले त्याचवेळी शिवसैनिक तिथे घोषणा देत होते. यावेळी या शिवसैनिकांच्याच अंगावर गाडी घालून तिथूनच जाण्याचा अट्टहास सोमय्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांच्या पायालाही दुखापत झाली. यावेळी संतप्त झालेल्या जमावातून भिरकावण्यात आलेला दगड किरीट सोमय्या यांच्या गाडीला लागून काच फुटली. खार आणि वांद्रे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे.

आमचा प्रसाद तयार हाय, रवी राणा आलाच नाय!
आज सकाळी 8 वाजल्यापासूनच खार येथील राणांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. घडय़ाळाचे काटे 9 च्या दिशेने सरकत होते तसा शिवसैनिकांचा रुद्रावतार वाढत होता. 9 ची डेडलाइन टळली तशी ‘आमचा प्रसाद तयार हाय, रवी राणा आलाच नाय’ अशा घोषणा द्यायला शिवसैनिकांनी सुरूवात केली. राणा दांपत्याविरोधात घोषणा देतानाच तितक्याच जोषात ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणाही घुमत होत्या. घोषणांची तीव्रता आणि शिवसैनिकांचा संताप पाहिल्यानंतर ‘हनुमान चालिसा पठण’ सोडाच, शिवसैनिकांच्या आसपास फिरकण्याचीही कोणाची हिंमत झाली नाही.

मातोश्रीबाहेरही शिवसैनिक ‘स्वागता’ला सज्ज
हजारो शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या खार येथील घराला वेढा घातला असला तरी शेकडो शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर त्यांच्या ‘स्वागता’ला ‘प्रसाद’ देण्यासाठी सज्ज होते.