परदेशी मैदानांवर बहुतेक संघ ‘फेल’, मग टीम इंडियाच टार्गेट का; महागुरू रवी शास्त्री यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन

हिंदुस्थानी क्रिकेट संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशी मैदानांत त्यांची त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला घरच्या मैदानावरील वाघ असे डिवचले जाते. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हिंदुस्थानी संघाची पाठराखण करताना जगातील कोणत्याही संघाला परदेशात चमकदार कामगिरी करता आलेली नाही मग टीम इंडियालाच परदेशातील अपयशासाठी टार्गेट का केले जात आहे, असा संतप्त सवाल केला आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट संघ 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. आफ्रिकेत त्यांना 1-2 असा आणि इंग्लंडमध्ये 1-4 असा पराभव पत्करावा लागला. या दोन्ही दौऱ्यावर हिंदुस्थानी संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीने सांभाळली होती. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिंदुस्थानी संघाची कामगिरी कशी होईल याबाबत विचारले असता शास्त्राr म्हणाले, ‘चुकांमधून शिकायचं असतं. परदेशात फार कमी संघांना चांगली कामगिरी करता आलेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी अशी कामगिरी केलेली आहे. या दोन संघांव्यतिरिक्त परदेशात कोणत्या संघाला चांगली कामगिरी करता आली आहे का? मग एकटय़ा हिंदुस्थानी संघालाच का टार्गेट करणे योग्य वाटते का?’

आफ्रिका, इंग्लंड दौऱ्यात अनेकदा विजयाच्या संधी गमावल्या !

आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंशी चर्चा केली आहे का, असे विचारले असता शास्त्राr म्हणाले, ‘त्या दोन्ही दौऱयांत आम्हाला बरेच शिकायला मिळाले. आम्ही अनेकदा विजयाच्या जवळ आलो होतो, परंतु त्या संधीचे आम्हाला सोने करता आले नाही. त्यामुळे आम्हाला तिथे कसोटी मालिका गमवाव्या लागल्या.