टी -20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री काय करणार? समालोचनासह विविध ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी- 20 विश्वचषकानंतर टिम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यानंतर टिम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री पुन्हा समालोचनाच्या क्षेत्राकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, समालोचनासह त्यांच्याकडे अनेक ऑफर आहेत. ते कोणता पर्याय स्वीकारतात, हे विश्वचषक सामन्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Cricbuzz च्या वृत्तानुसार आयपीएलमधील अहमदाबादच्या नव्या टीमने रवी शास्त्री यांच्याशी संपर्क साधून त्यांना टीमच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपद देण्यासोबतच भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक तर आर. श्रीधर यांनाही गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची टीमची इच्छा आहे.

दोन दशकात रवी शास्त्री यांनी क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. तसेच त्यांचे समालोचन लोकप्रियही झाले आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर ते पुन्हा समालोचन क्षेत्राकडे वळतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टार आणि सोनी स्पोर्ट्सने रवी शास्त्री यांच्याशी समाचोलनासाठी संपर्क केल्याचे वृत्त आहे. मात्र, आयपीएलमधील कोणत्याही टीमच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यास समालोचनाच्या क्षेत्रात पदार्पण करणे त्यांना कठीण होणार आहे. टी -20 विश्वचषकानंतरच रवी शास्त्री कोणता निर्णय घेतात ते स्पष्ट होणार आहे.