अश्विनचा अष्टपैलू विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानचा रविचंद्रन अश्विन एकापाठोपाठ एक विक्रमांचे शिखर चढतोय. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनने जॉनी बेअरस्टॉची विकेट घेत आणखी एक इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध 1 हजार कसोटी धावा आणि 100 विकेट घेणारा अश्विन हा पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे तर कसोटी इतिहासातील सातवा अष्टपैलू होण्याचा मान मिळवला आहे. रांची येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आकाश दीपने दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टॉने मोर्चा सांभाळत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, अश्विनने बेअरस्टेला 38 धावांवर बाद करून ही जोडी पह्डली. या विकेटसह त्याने इंग्लंडविरुद्ध 100 विकेट आणि 1 हजार कसोटी धावा करण्याचा मान पटकावला. कसोटी इतिहासात इंग्लंडच्या विल्फ्रेड ऱहोड्स, इयान बोथम, स्टुअर्ट ब्रॉड, ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज गिफेन आणि मॉण्टी नोबेल तसेच वेस्टइंडीजच्या गॅरी सोबर्स यांनी एका संघाविरुद्ध 100 विकेट आणि 1000 धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे.