साहित्यजगत – ध्यासमग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल गेल्या महिन्यात झाला, पण त्याला सुधीर नांदगावकर नाहीत असं पहिल्यांदाच घडत होतं. याचं कारण त्यांचं गंभीर आजारपण! तरीदेखील त्या अवस्थेत ते टेलिफोनवरून किरण शांताराम, संतोष पाठारे यांसारख्यांना फोन करून फेस्टिव्हलचा हालहवाल जाणून घेत होते. ते ऐकत असताना त्यांच्या जिवाची तगमग होत होती की, आपण या फेस्टिव्हलला हजर राहू शकत नाही. जणू सारं आयुष्य चित्रपट चळवळीला वाहून घेतलेल्या नांदगावकरांना हे असह्य होत होतं.

अखेरीस ही तगमग, कोंडी मृत्यूनेच सोडवली. दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

दुःखात सुख एवढंच की, मृत्युशय्येवर का होईना, त्यांना थर्ड आय फेस्टिव्हलतर्फे त्यांच्या सेवेची पावती म्हणून, ‘जीवन गौरव’ म्हणून सत्यजित रे पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने अर्पण करण्यात आला.

सुधीर नांदगावकरांनी ‘मराठा’, ‘रसरंग’मधून पत्रकारिता केली. एकेकाळच्या जनसंघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा मुद्रण व्यवसायदेखील होता, पण त्यांची ओळख मात्र प्रभात चित्र मंडळाचे, चित्रपट चळवळीचे म्होरके अशीच होती. पत्रकारिता करताना त्यांच्या लक्षात आलं की, हॉलीवूडखेरीज परदेशी चित्रपट पाहण्याची सोय पश्चिम मुंबईतील फिल्म सोसायटय़ांमध्येच आहे. दादरसारख्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी, त्यातसुद्धा म्हणायचं झालं तर मराठी माणसाला या गोष्टीचा गंधदेखील नाही. म्हणून मग त्यांनी चळवळे, दिनकर गांगल, अशोक जैन अशा समविचारी मित्रांना घेऊन प्रभात चित्र मंडळाची स्थापना केली.

त्यामुळे सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांच्यासारख्या देशी दिग्दर्शकापासून इंगमार बर्गन, फेलिनी, कुरासावो यांसारख्या परदेशी दिग्दर्शकांचे अत्युत्तम कलात्मक  चित्रपट दादरमध्ये सहज बघायला मिळू लागले. हे सर्व खेळ दादरला मिनी चित्र थिएटरमध्ये होत असत. तेथे 85 आसनांची क्षमता होती, पण रसिक आजूबाजूच्या जागेत जमेल तसे उभे राहूनदेखील चित्रपटाचा आस्वाद घेत. तरीसुद्धा अनेकांना जागेअभावी परत जायला लागे, तेव्हा तीन- तीन खेळ करायला लागले. काही काळ तर खास महिलांसाठी एक खेळ होता.

सुधीर नांदगावकरांचं हे देणं न विसरता येण्यासारखंच. या धडपडीतून पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे ‘मामि’, ‘थर्ड आय’ असे फिल्म फेस्टिव्हल भरवले. साहजिकच फिल्म सोसायटी फेडरेशनचे ते अध्यक्ष झाले. हा सगळा अट्टहास चित्रपटाची जाण वाढवण्याकरिता होता. त्या कल्पनेतून ‘चित्रवाणी’सारखे चित्रपटविषयक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी मासिक सुरू केले. या सर्व कार्यातूनच पुढे अशोक राणे, संतोष पाठारे, देशपांडे ही चित्रपट अभ्यासक मंडळी तयार झाली. पुढे तर त्यांनी डाक्युमेंटरी चित्रपटदेखील दिग्दर्शित केले. सर्वसाधारण रसिकांना तर आगळेवेगळे चित्रपट पाहायला मिळत होते, ते संतुष्ट होते. या सगळय़ात सुधीर नांदगावकरांचा मोठा वाटा आहे हे कुणीही नाकारत नाही. जणू त्यांनी त्यासाठी वाहून घेतलं होतं.

अर्थात त्यामुळे चारचौघांसारखा संसार ते करूच शकत नव्हते. त्यांच्या ‘सिनेमा संस्कृती’ (प्रकाशक एशियन फिल्म फाउंडेशन, 2011) पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत त्याचं प्रतिबिंब दिसतं. त्यांनी म्हटलंय…

सिनेमाचा छंद खूप वेळखाऊ असूनही,

त्याबद्दल जराही तक्रार न करता, 

निरंतर मनस्वी साथ देणाऱया सौ. सुनंदास…

आपल्या पत्नीला अर्पण केलेल्या सिनेमाच्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतदेखील नांदगावकरांचं चित्रपट प्रेम लपत नाही ते असं.

सुधीर नांदगावकरांच्या जिव्हाळय़ाच्या माणसांत आचार्य अत्रे, अटल बिहारी वाजपेयी, गुरुदत्त असे गुणिजन होते. त्यांच्याविषयी बोलताना नांदगावकरांना अगदी भरतं येई.

त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या हिंदी भाषणाचा अनुवाद करून त्यांनी ‘अटलजींचे आवाहन’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्या लेखसंग्रहातील ‘आता हिंदू मार खाणार नाही’, ‘हवन करताना हात पोळू नयेत’, ‘इतिहास बदलण्याची संधी चालून आली आहे’ यांसारखी भाषणं कालातीत वाटावीत अशी आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व हिंदुस्थानी भाषा जमेत धरूनसुद्धा  पहिले मराठी पुस्तक ठरले. त्याचे श्रेय सुधीर नांदगावकरांच्या जाणकारीला द्यावे लागेल.

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कवितांचे पुस्तक,  कॅसेट्स, भाषणांचे संग्रह, चित्रमय चरित्र अशी पुस्तकांची लाटच आली. अशा काळात सुधीर नांदगावकरांनी मात्र अटलजी म्हणजे केवळ राजकारणी धुरंधर नाहीत, तर त्याच्या पलीकडे ते एक उत्तम लेखक, उत्तम वाचक, व्यक्तिविमर्षक आहेत हे दाखवणारी त्यांची भाषणे ‘राजनीती के उस पार’ या संग्रहात एकत्रित केली. ही भाषणे नांदगावकरांनी प्रयत्नपूर्वक गोळा केली. हे काम सोपे नव्हते. हे सगळे पाहून वाजपेयी म्हणाले,‘‘ये सब कहां से आपने जमा किया? अचरज की बात है…’’

याच भाषणांचा मराठी अनुवाद पुढे विद्याधर ठाणेकर यांनी प्रकाशितही केला, ‘राजकारणापलीकडील अटलजी.’

सुधीर नांदगावकरांचा आणखी एक हळवा कोपरा होता गुरुदत्त. चित्रपट अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता गुरुदत्त! प्रभात चित्र मंडळ 1968 मध्ये स्थापन झाले. लगेच 10 ऑक्टोबर 1968 ला नांदगावकरांनी गुरुदत्तचा ‘प्यासा’ चित्रपट दाखवून त्याचा चौथा स्मृतिदिन साजरा केला. त्या वेळी गुरुदत्तची पत्नी गीता दत्तदेखील आली होती. त्यावेळंचं तिचं दुखरं भाषण ऐकून तिच्या मनात काय काय जपलेलं आहे हे कळत होतं. झाल्या प्रकाराने नांदगावकरांनी गुरुदत्त, त्याचे चित्रपट, त्याचा दुःखद शेवट, आत्महत्या की दुसरं काही याचा शोध सुरू केला. संबंधितांच्या मुलाखतींमधून त्याने धागेदोरे जुळवायला सुरुवात केली. यात बराच काळ गेला. गुरुदत्तचा 25 वा स्मृतिदिन प्रभात चित्र मंडळाने ‘कागज के फूल’ चित्रपट दाखवून साजरा केला होता. त्याला त्या वेळी जाणती झालेली गुरुदत्तची मुले अरुण आणि तरुण आली होती. ते दोघे मग चित्रपट मंडळाचे सभासद पण झाले. एके दिवशी नांदगावकरांनी त्यांच्याकडे गुरुदत्तचा एखादा चांगला फोटो मिळेल का? अशी विचारणा केली. त्याबरोबर तरुण व अरुण यांनी लगेच फ्रेम केलेला गुरुदत्तचा फोटो दिला, जो आजही प्रभात चित्र मंडळात दिसतो.

दरवर्षी 10 ऑक्टोबरला हार घालून नांदगावकर गुरुदत्तच्या आठवणींना  उजाळा देत असत तेव्हा त्यांना हमखास माझ्यासारखा विचारी की, त्या गुरुदत्तवरच्या पुस्तकाचं काय झालं… पण नांदगावकर यांच्या अनंत व्यापात ते राहून जात होतं.

मात्र कोरोना काळाचा फायदा घेऊन आयुष्याच्या संध्याकाळी गुरुदत्तसंबंधात त्यांनी चक्क कादंबरी लिहून पूर्ण केली. गुरुदत्त आणि त्याचा सर्व काळ त्यांच्या ‘सरमिसळ’ या कादंबरीत आहे. नांदगावकर तर गेले, पण त्यांची गुरुदत्तवरची कादंबरी आली, ते त्यात दिसतीलच.

असा हा ध्यासमग्न ‘नांदगावकर’ नावाचा माणूस! त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली!!