मोठ्या रकमेच्या कर्जावरून शहरी सहकारी बँकांवर आरबीआयचे निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांवर (UCB) निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या रकमेची कर्जाऊ रक्कम आता या बँकांना देता येणार नाहीत. पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत झालेला आर्थिक घोटाळा आणि त्यामुळे खातेदारांना सहन करावा लागलेला मनस्ताप यांमुळे हा निर्णय बँकेने घेतला आहे.

एखादा ऋणको (कर्ज घेणारा) किंवा ऋणको गट बऱ्याचदा शहरी सहकारी तत्त्वाच्या बँकेकडून मोठी रक्कम कर्जाऊ म्हणून उचलतो. मात्र, जेव्हा त्या कर्जाची परतफेड करता येत नाही, तेव्हा तो घटक त्या बँकेसाठी अचल (non-performing) होऊन जातो. जर कर्जाची रक्कम काही कोटींच्या घरात असेल तर याचा थेट परिणाम बँकेच्या भांडवला वर होतो. तसंच अशा वेळी बँकचा आर्थिक डोलारा कोसळण्याची जोखीम वाढते, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

त्यामुळे आरबीआयने यूसीबी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या कर्जांवरही काही बंधन घातली आहेत. बँकांकडून मोठ्या कॉर्पोरेट कर्जांच्या रकमेत काही टक्क्यांची घटही करण्यात आली आहे. एका ऋणकोमागे 25 लाखांहून अधिक रक्कम कर्जाऊ देऊ नये अशा सूचनाही आरबीआयने केल्या आहेत. यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वंही ठरवण्यात आली असून ती 31 मार्च 2023पासून लागू होणार आहेत.