
सामना प्रतिनिधी । मुंबई
महागाईच्या आगीत आधीच जनता होरपळत असताना सरकारने त्यात आता व्याजदरवाढीचे तेल ओतले आहे. त्यामुळे महागाईचा आणखीनच भडका उडाला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्याची वाढ केल्याने रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. याचा फटका कर्जदारांना बसणार आहे. कारण रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्ज महागणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीस पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू आहे. या बैठकीच्या तिसऱया दिवशी रिझर्व्ह बँकेने या बैठकीचा अहवाल जाहीर केला. रिझर्व्ह बँकेने जूनमध्येच रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ करण्याचे संकेत दिले होते.
जीडीपी जैसे थे, महागाई भडकणार
जीडीपी म्हणजेच आर्थिक विकास दर २०१८-१९ मध्ये जैसे थे म्हणजेच ७.४ टक्के राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर महागाईचा भडका वाढेल असाही अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत महागाईचा दर ४.६ टक्के, जुलै ते डिसेंबर या सहामाहीत ३.८ टक्के तर पुढच्या आर्थिक वर्षात हाच दर आणखी वाढून पाच टक्क्यांवर पोहोचेल. निसर्गाच्या लहरीपणामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतील. तर कच्च्या तेलाच्या किमती वाढून त्याचा थेट परिणाम महागाई वाढण्यावर होण्याची शक्यताही आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
वाहने महागली
एकीकडे अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे वाहनेही महागण्याची शक्यता आहे. परकीय चलनातील चढउतार आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे मारुती सुझुकी इंडिया या कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनीही आपल्या वाहनांच्या किमती ऑगस्टपासून वाढवण्याची घोषणा केली आहे.

























































