
सामना प्रतिनिधी, भडगाव
येथील मतदान केंद्र क्रमांक 107 कर मतांमध्ये फरक आढळून आल्याने मतदान केंद्राध्यक्षासह मतदान अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर आता त्या मतदान केंद्राकर 29 एप्रिलला पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव ए. एन. दास यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
23 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात भडगाव येथे मॉकपोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर न केल्यामुळे मॉकपोलचे 50 मते मशीनमध्येच राहिले. मतदान केंद्राध्यक्ष यांनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब व मतदान नोंदवही यांच्या तपासणीत मतदार नोंदवहीत 555 मतांची नोंद निघाली. मात्र, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत 608 मते मतदान यंत्रात निघाली. 53 मतांचा फरक आढळून आला. 50 मतांव्यतिरिक्त 3 मतांचा आणखी फरक आढळून आल्याने दोघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना 29 एप्रिल रोजी मतदान केंद्र क्र. 107 वर पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. आता 29 एप्रिल सोमवार रोजी या केंद्रावर ठरवून दिलेल्या वेळेत पुन्हा मतदान होणार आहे.


























































