साहित्यजगत- श्रावणातले ग्रंथ वाचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>>रविप्रकाश कुलकर्णी

साध्या पुस्तकाच्या दुकानात गेलात तर कुठल्या पुस्तकांना मागणी दिसते, तर सर्वाधिक मागणी आहे ‘संपूर्ण चातुर्मास’ या पुस्तकाला. नित्योपयोगी आरत्या, हिंदू सण व व्रते, नित्योपयोगी स्तोत्रे, कहाण्या इत्यादी गोष्टींचा संकलित संग्रह म्हणजे ‘संपूर्ण चातुर्मास.’

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढाच्या पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात, पण हा चातुर्मास एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेतो. मुळात ‘चातुर्मास’ असा शब्द प्रमाणभाषेत सापडणार नाही म्हणून लक्ष वेधतो. तो कसा ते पहा…

चतुर + भुज म्हणजे चतुर्भुज, चतुर + वर्ण म्हणजे चतुर्वर्ण. याप्रमाणेच मग चतुर + मास म्हणजे चतुर्मास होणार ना?

तरी चातुर्मास का म्हणतात?

तर ही गफलत शुद्धलेखन कोशकार अरुण फडके यांनी सर्वप्रथम लक्षात आणून दिली. त्यामुळे मग कालनिर्णयमध्ये जयंत साळगावकरांनी दुरुस्ती केली.

तरी अजून आपण चातुर्मास असंच का म्हणतो वा लिहितो?

रूढीबदल किती कठीण हेच खरं. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे ‘संपूर्ण चातुर्मास’ हे पुस्तक.

आता 18 जुलैपासून अधिक श्रावण मासारंभ होत आहे आणि निज श्रावण मासारंभ 17 ऑगस्टपासून सुरू होऊन 15 सप्टेंबरपर्यंत आहे. (16 सप्टेंबरपासून भाद्रपद लागतो.)

तर अधिक मासाबाबत अधिक माहिती व्हावी म्हणून अंजली पब्लिशिंग हाऊसने ‘अधिक मास म्हणजे काय?’ असे पुस्तक प्रकाशित केले आहे. 18 वर्षांनंतर हा अधिक श्रावण आला आहे म्हणून त्याचं हे महत्त्व.

‘संपूर्ण चातुर्मास’ या नावाने प्रथम पुस्तक काढले ते का. अ. जोशी यांनी. हा प्रकार इतका लोकप्रिय झाला की, पुढे बहुतेक धार्मिक  प्रकाशने करणाऱयांनी ‘संपूर्ण चातुर्मास’ थाटाची पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात दिवाकर घैसास, वि. के. फडके असे संकलकही दिसतात. इथे हेही सांगितले पाहिजे की, अशा प्रकारच्या पुस्तकाचे श्रेय पांगारकरांच्या ‘भक्तिमार्ग प्रदीप’कडे जाते. एकेकाळी या पुस्तकाने खपाचे उच्चांक गाठले होते. श्रावणात ग्रंथवाचन केलं जातं त्यात ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’, ‘दासबोध’, ‘एकनाथी भागवत’, ‘गुरुचरित्र’, ‘गुरूलीलामृत’ अशा ग्रंथांचेदेखील व्यक्तिगत/सामुदायिक वाचन होतं. वर नमूद केलेल्या सर्व ग्रंथांचे आता इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे अनुवाद दिवाकर घैसास यांनी केलेले आहेत आणि केशव भिकाजी ढवळे प्रकाशनने प्रकाशित केले आहेत. हा एक पाम ठरावा. श्रावणसुख म्हणून एक अनुभूती आहेच. त्यात ग्रंथवाचनाची भर पडते.