
उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. घशाला शोष पडतो. उष्णतेने जीव नकोसा होतो. पण, तरीही उन्हाळ्याच्या मोसमाची अनेक जण वाट पाहत असतात. याचं मुख्य कारण म्हणजे आंबा.
वर्षातून एकदाच येणारं हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. अतिशय रसदार, मधुर, शक्तिवर्धक असं वर्णन असणारा आंबा त्याच्या याच गुणांमुळे फळांचा राजा मानला जातो. पण, गंमत म्हणजे उन्हाळ्यात येणारं हे फळ गुणधर्मालाही उष्ण आहे. त्यामुळे आंबा खाण्याचे काही सोपे नियम पाळले तर ऐन उन्हाळ्यात कोणत्याही त्रासाविना त्याची मजा घेता येते.
यातला एक मुख्य नियम म्हणजे आंबा खाण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास पाण्यात भिजवून ठेवला जातो. आपल्या सर्वांच्याच घरात आजी-पणजीपासून चालत आलेली ही पद्धत आहे. पण, या मागे एक वैज्ञानिक कारण आहे. आंबा हा प्रकृतीने उष्ण असतो. त्यात थर्मोजेनिक गुणधर्म आढळतात. त्यामुळे त्याच्या सेवनापूर्वी पाण्यात भिजवल्यास त्याची उष्णता कमी होते. असा आंबा खाल्ल्यास आंब्यातील क जीवनसत्व, तंतुजन्य घटक यांचा फायदाही अधिक होतो. फळं पाण्यात भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, जुलाब किंवा डोकेदुखी सारख्या त्रासाला सामोरं जावं लागत नाही, असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो.
आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील फायटिक आम्ल बाहेर पडतं. त्यामुळे हातालाही गरम लागणारा आंबा उन्हाळ्यात खाल्ला तरीही बाधत नाही. तसंच, आंबा पिकवण्यासाठी शेतकरी बऱ्याचदा त्याच्यावर रसायनांची फवारणी करतात. ती घातक रसायनं देखील पोटात जायची शक्यता असते. आंबा लगेच धुऊन खाल्ल्यास देखील हा धोका संभवतो. त्यामुळे त्याला भिजवून मग खाल्ल्यास त्यावरील रसायने निघून जाण्यास मदत होते.






























































