नेहमी थकवा जाणवतोय….मग करा ‘हे’ उपाय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे दररोजचा त्रासाचा आणि थकवणारा प्रवास कमी झाला असला तरी अनेकांना नेहमी थकवा जाणवतो. नेहमी थकवा जाणवण्यामागे काही कारणे असतात. तसेच या थकव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मानसीक आणि शारीरिक श्रम केल्यानंतर थकवा येणे साहजिकच आहे. मात्र, काहीजणांना नेहमी थकवा जाणवतो. अशा व्यक्तींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते. तसेच काहीजणांमध्ये रक्ताची कमतरता असते. त्यामुळेही थकवा जाणवतो. विटामीन बी आणि फॉलीक अॅसिडच्या कमतरतेमुळेही थकवा जाणवण्याची समस्या भेडसावते. ही समस्या कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्यासोबतच शरीराला पोषक घटक मिळण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

नेहमी थकवा येण्याची समस्या कमी करायची असल्यास द्रव पदार्थाचे सेवन वाढवण्याची गरज आहे. ज्यूस,सूप, ताक, डाळ, निंबू पाणी अशा गोष्टींचे त्यात समावेश करावा. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. तसेच कमीतकमी 8 ग्लास पाणी दिवसाला घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे येणार थकवा कमी होतो. तसेच उत्साह कायम राहील. नेहमीच्या ताणतणावामुळेही थकवा जाणवतो. त्यामुळे ताणतणावातून मुक्तीसाठी व्यायाम आणि ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि मेडिटेशनमुळे थकवा येण्याची समस्या कमी होते.

प्रत्येक सिजनमध्ये येणाऱ्या फळांचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणतत्वे मिळतात. त्याचप्रमाणे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये भरपूर पोषणद्रव्ये असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी उर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. काहीजण फक्त हिवाळ्यात सुकामेव्याचे सेवन करतात. मात्र, इतर ऋतूत दूधासोबत सुकामेवा घेतल्यास शरीराला आवश्यक घटक आणि उर्जा मिळते. सुकामेव्यामुळे शरीराला बळकटी मिळते, त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शरीरात उत्साह कायम राहतो. जीवनशैलीत काही बदल केले आणि शरीराला आवश्क पोषकत्तत्वे मिळाल्यास नेहमी थकवा येण्याची समस्या कमी करता येते.