
आर.ई.सी ही महारत्न कंपन्यांपैकी सरकारची एक महत्त्वाची कंपनी आहे. उर्जा मंत्रालयाअंतर्गत येणारी ही कंपनी बिगर बँकींग वित्त पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठीच्या दुसऱ्या तिमाहीसाठीचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार कंपनीने 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रेकॉर्डब्रेक 3773 कोटींचा नफा मिळवला आहे. या कंपनीची संपत्ती आता 63117 कोटींच्या घरात पोहोचली आहे. या कंपनीकडजून देण्यात येणाऱ्या कर्जाचा आकडा वाढता असून कर्जवसुली आणि व्याजातून मिळणारा नफाही वाढला आहे. यामुळे यंदाच्या तिमाहीमध्ये या कंपनीला चांगला नफा मिळाला आहे. 6 महिन्यांचा विचार करायचा झाल्यास 2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीचा नफा हा 5176 कोटींवरून 6734 कोटींवर गेला आहे.




























































