बीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट

3381

pratik-poyrekar-chefमेथी आणि बीट या दोन्ही भाज्या पौष्टीक असतात. मात्र मुलं या दोन्ही भाज्या खायला टाळाटाळ करतात. म्हणून आज शेफ प्रतीक पोयरेकर यांनी सामनाच्या वाचकांसाठी ‘बीट व मेथीच्या पौष्टीक कटलेट’ची रेसिपी दिली आहे. मुलांच्या डब्ब्यासाठी तसेच मधल्या वेळेतला खाऊ म्हणून ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. 

 

साहित्य :  1 वाटी बारीक कापलेले बीट, 1 वाटी रताळे, 1/2 वाटी बारीक चिरलेली मेथी, 1/2 वाटी बारीक कापलेले गाजर, 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा, दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या, बारीक चिरलेले आलं लसून, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जीरे पावडर, 1/2 चमचे काळे मीठ, 1 टीस्पून गरम मसाला,
2 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ तेल (बीट व गाजर किसून देखील वापरू शकता)
कृती :
– कुकरमध्ये रताळे उकडून घ्या. त्यानंतर रताळ्यांची साल काढून ते व्यवस्थित कुस्करून घ्या.

– एका मोठ्या पॅनमध्ये तेल टाकून त्यात बारिक चिरलेला कांदा, आलं, लसुन भाजून घ्या आणि त्यात बारिक चिरलेले (किसलेले) बीट, मेथी आणि गाजर टाका. व्यवस्थित शिजल्यावर त्यात गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट, चवीपुरते मीठ टाका व पुन्हा परतवा.

– एका मोठ्या वाडग्यात मॅश केलेले रताळे, बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर, तयार केलेले कांदा बीट,मेथी गाजरचे मिश्रण टाका. ते सर्व व्यवस्थित एकजीव करा.

– त्या मिश्रणाचे गोल आकाराचे पण चपटे कटलेट तयार करून घ्या. गॅसवर पॅन गरम करायला ठेवा. त्यावर तेल टाकून कटलेट दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्या.

– तयार कटलेट टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या