
सामना प्रतिनिधी । बीड
गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस पडला. त्यानंतरही सिंचनासाठी झालेला पाण्याचा वापर, बाष्पीभवन व विंधन विहिरीद्वारे होत असलेला पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळीत २.७८ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक भूजलाची घट गेवराई तालुक्यात ४.७३ मीटर इतकी आहे.
भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेकडून दर चार महिन्याला भूजल पातळी मोजली जाते. यासाठी या विभागाकडून जिल्ह्यातील १२६ विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. गत पाच वर्षापूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये जिल्ह्याची भूजल पातळी ७.८ मीटर इतकी होती. त्यात आता घट झाल्याने फेब्रुवारी अखेर ही पाणीपातळी ९.८६ मीटरवर जावून पोहचली आहे. भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेकडून केलेल्या सर्व्हेक्षणात तालुकानिहाय भूजल पातळी विक्रमी घट झाली आहे. यात आष्टी तालुका-२.८४ मीटर, आष्टी-१.५४, बीड-१.५०, धारूर-४.१६, गेवराई-४.७३, केज-२.६८, माजलगाव-३.९०, परळी-१.३१, पाटोदा-२.४९, शिरूर-३.९३ तर वडवणी तालुक्यातील भूजल पातळीत -१.५१ इतकी घट झाली आहे.






























































