
मागील 15 ते 20 वर्षांपासून सरकारी रुग्णायलयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य सरकारने वाऱयावर सोडले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सरकारी रुग्णालयात नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले. त्यानुसार एमपीएससीने 427 पदांसाठी जाहिरात देऊन अर्जही जारी केले आहेत, मात्र या निर्णयामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी 15 ते 20 वर्षांचा काळ घालवणाऱया तात्पुरत्या नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱयांवर अन्याय झाला आहे. मागील कित्येक वर्षे सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत हे अधिकारी होते, मात्र आता त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
सर जे. जे. रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. राठोड 15 वर्षांपासून ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे. हे पद कायम असतानाही ते या रुग्णालयात तात्पुरत्या नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मागील 15 वर्षांच्या योगदानाचा विचार न करता आता सरकारने राठोड यांच्या जागी एमपीएससीमार्फत भरलेल्या कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अन्यायाविरोधात डॉ. राठोड यांनी दाद मागितली असून दिलासा देण्याची मागणी केली आहे.
400 अधिकाऱयांचे भवितव्य अंधारात
एमपीएससीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 427 पदांसाठी जाहिरात देत अर्ज जारी केले आहेत. सध्या 20 राज्य सरकार संचालित रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट ‘अ’ आणि ‘ब’ची 572 मंजूर पदे आहेत. राज्यभर सुमारे 400 वैद्यकीय अधिकारी या मंजूर 572 पदांवर गेली 2-15 वर्षे तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी सेवा कायमस्वरूपी मिळण्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु त्यांना मागील 15 वर्षांपासून चार महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीच्या ऑर्डर्स दिल्या जात आहेत.
वयाची 45 वर्षे पूर्ण; भरतीसाठी पात्र नाही
तात्पुरत्या नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकाऱयांनी वयाची 45 वर्षे ओलांडल्याने ते एमपीएससीमार्फत अर्ज भरण्यास पात्र नाहीत, असे डॉ. अरुण राठोड यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षण विभागाने 2019 पासून आतापर्यंत चार ते पाच वेळा डॉ. राठोड यांची कागदपत्रे मागितली. त्यामुळे सेवेत कायम केले जाईल अशी आशा त्यांना होती. 15 वर्षांच्या सेवेत डॉ. राठोड यांनी मेडिको-कायदेशीर विभाग, रक्तपेढी, ओमप्रकाश शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये चोवीस तास विनाशुल्क काम केले आहे.



























































